Pages

Saturday, May 15, 2010

अशीच मे महिन्यातील एक दुपार...

अशीच मे महिन्यातील एक दुपार...बाहेर रणरणत उन...

मी माझ्या भाच्याकडे गेलो. मे महिन्याची सुट्टी सुरू झाली होती. म्हणल बघाव काय चालू आहे ते !  तर स्वारी आरामात कंप्यूटर गेम खेळत बसली होती. बाजूला लेज चिप्स आणि कोक होतच.

मी विचारला "काय सुट्टिचे काय प्लान आहेत?" तो स्क्रीन वरुन लक्ष  जराही विचलित न करता तो म्हणाला " काही नाही, आजच ही वॉर अँड वॉरक्रॅफ्ट आणली आहे. आज खेळून संपवीन मग उद्या दुसरा पार्ट आणायचा.. एक किंग्डम डेस्ट्राय केलाय मी, आता उद्या दुसर उडवायचाय. शिवाय काही चिट कोड्स ही डाउनलोड करायचे आहेत." एवढा बोलून तो पुन्हा त्या e-खाटिकखान्याकडे वळला. मी गप्प बसलो. आमचा संवाद संपला.

माझी बाकीची काम करून घरी परत आलो. घरी येऊन जेवलो. म्हणल आता जरा पडि घ्यावी. फ्यान जोरात सोडला. त्याच्या घर्घर आवाजबरोबर मला झोपेची गुंगी चढायला लागली. एव्हढ्यात "धप्पा" असा असा कोणीतरी खाली ओरडल आणि मुलांचा गोंधळ ऐकू आला. मी झटकन  उठलो आणि बघितले तर काही मुलं लपंडाव खेळत होती. मन झटकन भूतकाळात गेल...

अशीच मे महिन्यातील एक दुपार...बाहेर रणरणत उन...

मोठी माणस त्यांची त्यांची काम आवरून, जेवून खाउन आता वामकुक्षीच्या तयारीला लागलेली असत.  मग हळुहळू बाळगोपाळ मंडळीच्या हालचाली सुरू होत. एकेक भिडू वाड्याच्या मधल्या अंगणात जमा होऊ लागे. मग कुठला तरी एखादा खेळ ठरायचा आणि धमाल सुरू व्हायची.

काय नसायच त्या खेळात. स्पर्धा, हेवेदावे, पूर्व-वैमनस्य, भांडण, असुया,.... पण फक्त खेळापुरतच. बाकी एरवी फक्त मैत्री.
एकट्याने बसून कंप्यूटर गेम खेळण्यापेक्षा लाख पटीने मोलाच शिक्षण ह्या खेळामधून मिळायच आणि ते सुद्धा फुकट !!!
आता कुठे कुणी हे खेळ खेळत असतील का?

आपल्या आठवणी ताज्या करण्यासाठी ह्या काही जन्त्रि पहा:

अंगणात खेळले जाणारे खेळ 

  • विष-अमृत 
  • रुमाल पाणी
  • लंगडि
  • लपंडाव - हा खेळ जरा संध्याकाळी सुरू करायचा आणि "अंड" झाल की फार मजा यायची. 
  • आंधळी कोशिंबीर - कोणी कुठे भलातीकडेच चालला आहे अस वाटल की मागून ओरडायच "स्टॉप स्टॉप"
  • डुककर मुसंडी - हा खरतर पावसात खेळायचा खेळ. दोन्ही हात मानेच्या मागे ठेऊन कोपर पुढे करून फक्त डोक्याने दुसर्‍याला बाद करायच. बरेचदा डोक आपटून राज्य करणाराच बाद व्हायचा.
  • पायमारी - जमिनीवर पाय पसरून बसायच. हाताच्या आधारांवर रांगत रांगत चक्क पायानी बाद करायच. 
  • डबाडा ऐस पैस - "डबाडा ऐस पैस" अस ओरडायला मजा यायची.
  • गोट्या- यातल्या "हडकी" ने टोले द्यायला माझे हात आत्ताही शिवशिवत आहेत.
  • लगोरी
  • टिपरी पाणी- मुलींचा खेल 
  • चोर पोलिस
  • पतंग उडविणे -  ट्यूब लाइट च्या काचा कुटून घरच्या घरी मांजा बनवाने 
  • खांब खांब खांबोळी - "शिरापुरी.... पुढच्या घरी...." 
  • टिपी टिपी टिप टॉप - वॉट कलर यु वोंट? आणि मग वाळत घातलेल्या कपड्यापासून ते शर्टच्या बटणापर्यंतचे सगळे रंग शोधून होत.

काही बैठे खेळ

  • सापशीडी - अगदी शेवटी एक मोठ्ठा साप आहे त्याने गिळल की खल्लास
  • व्यापार - एकदा हॉटेल झाला की निवांत घ्यायच !! 
  • ल्युडो - 
  • बुद्धिबळ
  • पत्ते - असंख्य खेळ आणि जादू
  • कॅरम
  • उनो
  • नाव गाव फळ फूल - असा खेळ या पृथ्वीवर होता हे लोकांना सांगूनसुद्धा खर वाटणार नाही. !! 

घरगुती सरबते

  • रसना - मे महिन्याच स्पेशल डील
  • पन्ह
  • वाळा
  • मस्तानी

पुस्तक

  • चांदोबा - विक्रम वेताळ, आणि साउथ इंडियन स्टाइल चित्र
  • इंद्रजाल कॉमिक्स - वेताळ उर्फ "चालता बोलता समंध" , बहाद्दुर, मॅनड्रक्स आणि लोथार, फ्लॅश गॉर्डन. (ही आता कुठे मिळतात का?)
  • कुमार - 
  • चंपक - खरच भम्पक असायच.

  सुट्टीची स्पेशल पॅकेजेस

  • पुण्यात लहान मुलांसाठी बहुदा एव्हढीच ठिकाण होती.
  • संभाजी बाग - किल्ला , मत्स्यालय, भेळ, पाणीपुरी, बंदुकीने फुगे फोडणे
  • पेशवे पार्क - फुलराणी (तिकीट काढून बर का!! )
  • आईसक्रिम पॉट आणून आईसक्रिम बनवणे 
  • पर्वती - पाहण्यासारख काय आहे मला अजुन कळलेले नाहीये.
  • राजा केळकर संग्रहालय

छंद

  • काडेपेट्यांचे छाप जमवणे - माझी आजी याला "भिकार्यांचे डोहाळे" म्हणायची.
  • स्टॅम्प जमवणे
  • रंगीत पिसे जमवणे - यात पिसांना "पिल्ल"(?) व्हायची म्हणे !!!! 
  • दगड, गोटे, शंख, शिंपले जमवणे - पुन्हा तेच. "भिकार्यांचे डोहाळे" !!! 
  • पिंपळाच्या पानाला वहित ठेऊन जाळी पाडणे.

शाळेतील बैठे खेळ

  • राजा राणी चोर शिपाई - ऑफ नाहीतर बुळ्या मास्तराच्या तासाला खेळायला बेस्त
  • पुस्तकातल क्रिकेट - याला "बालभारती" च पुस्तक म्हणजे दुधात साखर !!!
  • पेनापेनी - कॅरम सारखा पेनांनि खेळायचा खेळ. यात एकदाच "हिरो" च्या पेनाने मारता यायच. "ताड्या शॉट"
  • बॉलबेरिंग चा खेळ
  • स्टीलची पट्टी बाकाच्या फटीत घालून आवाज काढणे.- धनुष्याची प्रत्यंचा खेचून अर्जुनाने काय आवाज काढला असेल हे ऐकायच असेल तर हा आवाज ऐकाच.


- बोलघेवडा

3 comments:

  1. Ek numberrrrr Mitra............ sagale shaletale divas aathavale....... mastach... jiyo...

    ReplyDelete
  2. फारच सुंदर. क्षणभर मी नकळत आमच्या डोंबिवलीच्या ब्रह्मे वाड्यातल्या लहानपणच्या आठवणीत हरवून गेलो.
    खरेच,ते दिवस हल्लीच्या मुलांना लाखो रुपये खर्च करून सुद्धा आपल्याला देता येणार नाहीत.

    हेमंत पुरोहित.

    ReplyDelete